आमदार सावे स्वखर्चातून तीन विहिरींवर आरो प्लांट बसविण्यास तयार मनपाकडून एनओसी देण्यास टाळाटाळ !

Foto

औरंगाबाद: गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील पाणीप्रश्‍न पेटलेला असून, पाण्यावरून अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. औरंगाबाद (पूर्व) चे भाजप आमदार अतुल सावे यांनी शहरातील तीन ठिकाणी असलेल्या विहिरी निश्‍चित करून त्यावर स्वखर्चातून आरो प्लांट बसविण्याचे ठरविले आहे; परंतु यासाठी मनपा प्रशासनाच्या नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी)ची आवश्यकता आहे. गेल्या दहा दिवसापूर्वीं एनओसी मिळण्यासाठी मनपा प्रशासनाकडे प्रस्ताव दिलेला असताना अद्यापही एनओसी मिळाले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. 

जायकवाडी धरणातून शहरात येणारे पाणी 135 एमएलडीवरून 25 एमएलडी कमी होऊन 110 एमएलडीवर आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. सिडको, हडकोसह काही वसाहतींमध्ये सहा ते आठ दिवसांआड कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर ओरड केली जात आहे. गेल्या दोन महिन्यात याच कारणामुळे विविध वॉर्डातील नागरिकांनी मनपा मुख्यालय, पाणी टाकी आदी ठिकाणी आंदोलने केली. ही आंदोलने थांबता थाबायला तयार नाहीत. पाणीप्रश्‍नावरून नुकतेच नगरसेवकाने आयुक्‍तांच्या दालनात आंदोलन केले होते. त्यानंतर यासंबंधी बैठक घेण्यात आली. 

त्यानंतर आमदार अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक बैठक घेण्यात आली. त्यातही नगरसेवक समान पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले पाहायला मिळाले. एकीकडे अशी परिस्थिती असताना खुद्द आ.सावे यांनी शहरातील काही भागात असलेल्या विहिरींचा शोध घेऊन तेथे आरो प्लांट बसविण्याचे ठरविले आहे. पहिल्या टप्प्यात सिडको एन-6, एन-8 व न्यायनगर येथील मुबलक पाणी असलेल्या तीन विहिरींवर आरो प्लांट बसविण्यात येणार आहे;परंतु विहिरीत गाळ साचलेला असल्याने गाळ काढून हे काम करावे लागणार आहे. त्याकरिता जिल्हाधिकार्‍यांना पत्र देण्यात आले होते. त्यांनी ते पत्र एनओसी देण्यासाठी मनपा प्रशासनाकडे पाठविलेले आहे. हे पत्र देऊन दहा दिवस लोटल्यानंतरही मनपा प्रशासनाच्या वतीने अद्याप एनओसी देण्यात आलेली नाही. शुक्रवारी यासंबंधी संबंधि अधिकार्‍यांना पुन्हा एकदा आठवण करून दिली. त्यावेळी संबंधित अधिकार्‍यांनी लवकरात लवकर काम करतो, असे आश्‍वासन दिले असल्याचे आ. सावे यांनी सांजवार्ताशी बोलताना सांगितले.